पंचमहाल – एकीकडे देश करोनाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे राजकिय नेतेच करोनाचे नियम पायदडी तुडवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गुजरातमधील भाजप आमदार जुगार खेळताना रंगेहात पकडला आहे. भाजप आमदाराच्याच रिसॉर्टमध्ये जुगार खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
केसरी सिंह सोलंकी असे भाजप आमदाराचे नाव असून ते गुजरातमधील खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पंचमहाल पोलिसांनी कारवाई करत आमदारासह 25 जणांना रंगेहाथ जुगार खेळताना अटक केली असून यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ही कारवाई पंचमहाल पोलिसांनी केली आहे.
जुगार आणि रिसोर्टमध्ये मद्यसाठा ठेवण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आमदाराला अटक केली आहे. अवैधरित्या जुगार खेळणे, करोनाचे नियम न पाळणे आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत पंचमहाल जिल्हा पोलिसांनी आमदारासह 25 जणांना अटक केली आहे. यामध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे.
आम्हाला सोलंकी आणि इतर 25 जण जुगार खेळताना आढळले असून त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि कसीनोचे सामान जप्त करण्यात आली तसेच या कारवाईत आमदार केसरीसिंग सोलंकी यांच्यासह 25 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीपसिंग जडेजा यांनी दिली आहे.