आजोबांना जगवण्याचा “जम्बो’ निर्धार..!

पुणे -सीओईपी मैदानावरील जम्बो हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाला वाचवण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. बीड येथील या 60 वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर असून, त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्‍टर्स तसेच कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. या रुग्णावर 24 तास लक्ष ठेवण्यात येत आहे.

करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महापालिकेने 23 मार्च पासून जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू केले. यावेळी तब्बल 800 बेड्‌सची सुविधा उभारण्यात आली. येथे 30 जूनअखेर पालिकेने 3,009 रुग्णांवर उपचार केले आहेत. दरम्यान, करोनाची साथ उतरणीला लागल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे सुमारे दीडशे रुग्ण होते. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची प्रकृती आणि त्यांना बरे होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता, पालिकेने 22 जूनपासून “जम्बो’ बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 जूनला येथे 25 रुग्ण उपचार घेत होते.

त्यामुळे पालिकेने हे हॉस्पिटल 30 जूनला बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तोपर्यंत 24 रुग्ण कमी झाले. मात्र, एकाची प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे त्याला इतरत्र नेणे जीवावर बेतू शकते. हा विचार करून रुग्णाला ठणठणीत करण्याचा निर्धार महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच जम्बोच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

या रुग्णाच्या तपासणीसाठी गुरूवारी ससून रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जम्बो बंद करताना हा रुग्ण बरा करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. हा रुग्ण ठणठणीत होईपर्यंत “जम्बो’ सुरू ठेवण्यात येणार आहे.

 

==============

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.