बर्लिन – अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वीच युरोपातील बहुतेक देशांच्या सैन्याने तेथून यापूर्वीच माघार घेतली आहे. अमेरिकेने माघारीची घोषणा करण्यापूर्वीच या देशांची माघारीची प्रक्रिया पूर्ण देखील झाली आहे.
जर्मनी आणि इटलीच्या अफगाणिस्तानातील दूतावासांनी आपल्या सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे बुधवारीच जाहीर केले. तर पोलंडच्या अखेरची तुकडीही माघारी परतत आहे. या देशांनी कोणत्याही गाजावाजाशिवाय आपल्या सैन्याची माघारीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या पाठोपाठ “नाटो’च्या सैन्याने मोठा गाजावाजा करून अफगाणिस्तानच्या युद्धात उडी घेतली होती. मात्र माघारीच्यावेळी असा कोणताही गाजावाजा केला गेला नाही.
अफगाणिस्तानमध्ये सुमारे 7 हजार सैन्य होते. यावर्षी एप्रिलमध्ये नाटोने हे सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 11 सप्टेंबरपूर्वी माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे म्हटले होते. पण आता ही प्रक्रिया 4 जुलैलाच पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पण त्यापूर्वीच अन्य सहकारी देशानी आपले सैन्य माघारी घेतले आहे. जर्मनी, इटली, जॉर्जिया, स्पेन, स्वीडन, बेल्जियम यांच्याशिवाय पोर्तुगाल, चेक प्रजासत्ताक, स्लोवेनिया, फिनलंड, अल्बानिया, नॉर्थ मासिडोनिया आणि लक्सेंबर्गच्या छोट्या तुकड्या आता माघारी परतलेल्या आहेत.