पुणे – शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे 26 हजार 488 मुलांना बाधा झाली. दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 9 टक्क्यांवर असून, त्यातील 14 मुलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 0 ते 18 वयोगटातील ही मुले आहेत. तर आतापर्यंत 26 हजार 190 मुलांनी करोनावर मात केली असून 284 जणांवर हॉस्पिटल तसेच घरी उपचार सुरू आहेत.
मनपा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाच्या नवीन बाधितांची संख्या वाढणे सुरू झाले. त्यानंतर 1 मार्च ते 16 जूनपर्यंत शहरात एकूण 2 लाख 72 हजार 138 नवीन करोबाधित आढळले आहेत. त्यातील सुमारे 26 हजार 488 ही 0 ते 18 वयोगटातील मुले आहेत. एकूण बाधित मुलांच्या तुलनेत ही संख्या 9.73 टक्के आहे. तर एकूण बाधित मुलांपैकी तब्बल 95 टक्के मुले बरी झाली आहेत.
तिसरी लाट थोपवणार
करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत 29 हॉस्पिटलमध्ये सुमारे 1,700 बेड तयार ठेवले आहेत. त्यात 252 ऑक्सिजन विरहित बेड, 1 हजार 83 ऑक्सिजन बेड, 177 आयसीयू, तर 145 व्हेंटिलेटरचा समावेश आहे. या शिवाय, 250 बालरोग तज्ज्ञ या मुलांच्या उपचारासाठी असणार आहेत.