पुणे – ट्रकमध्ये झोपलेल्या चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 10 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.
दंडाची रक्कम न भरल्यास आणखी अडीच वर्षांचा कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान शहरात पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या मोक्काच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे ही शिक्षा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विजय उर्फ विज्या बिभीषण काळे, बाजीगर उर्फ बिऱ्या वाघमन्या काळे, उद्देश बिभिषण काळे (सर्व रा. इंदापूर) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी 2014 रोजी रात्री तीन ते सव्वातीनच्या दरम्यान सोरतापवाडी (ता. हवेली, पुणे) येथे हा गुन्हा घडला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले.