बर्लिन – जर्मनीने आपल्या धोकादायक क्षेत्रांच्या यादीतून इटली, झेक प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रियाचा बराच भाग काढला आहे. त्यामुळे आता प्रवासावरील बहुतेक निर्बंध हटवले जातील. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट या जर्मनीच्या रोग नियंत्रण केंद्राने जाहीर केलेले हे बदल रविवारपासून लागू होतील.
ऑस्ट्रियातील टायरोल आणि व्होरालबर्ग या दोन पश्चिम प्रांतांचा अपवाद वगळता अन्य भागांतील निर्बंध हटवले गेले आहेत. ज्यूरिच आणि बासेलसह क्रोएशिया आणि स्वित्झर्लंडच्या काही भागांवरील निर्बंधही कमी केले गेले आहेत.
जर्मनीतील सर्वाधिक धोका असलेल्या श्रेणीतील क्षेत्र म्हणून वर्गीकृत देशांतील प्रवाशांना 14 दिवस विलगीकरण आवश्यक आहे आणि प्रवासावरील निर्बंध जर्मन नागरिक आणि रहिवासी यांच्यापुरतेच मर्यादित आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये ब्रिटन त्या श्रेणीतील एकमेव युरोपियन देश राहिला आहे. यात भारत, नेपाळ, ब्राझील आणि उरुग्वेचा समावेश आहे.