नवी दिल्ली : योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आएमए यांच्यात सुरु झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता तर रामदेव यांननी आयएमए अधिकाऱ्यांचा संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी असून ते धर्म परिवर्तन करण्यासाठी चिथावतात असा आरोप केला आहे.
एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी सनसनाटी आरोप केले. धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांशी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे संबंध आहेत, एवढेच नाही तर इंटरनॅशनल फंडिंग घेणाऱ्या लोकांनीच कुंभला करोना सुपरस्प्रेडर म्हणत बदनाम केल्याचही रामदेव म्हणाले.
हे सगळे धादांत खोटे आहे. कारण कुंभमध्ये लोकच आले नाहीत. 99 टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये फार फार तर 500 ते एक हजार साधू होते असाही रामदेव यांनी दावा केला.
डॉक्टर मला देशद्रोही म्हणत असतील तर मग देशभक्त कोण आहे? ज्यांचे संबंध धर्मपरिवर्तनाशी जोडले गेलेत, ज्यांना असे वाटते की, करोना चांगला आहे कारण त्यामुळे धर्मपरिवर्तनही वाढेल ते देशभक्त आहेत का, असा सवाल त्यांनी केला. करोनासाठी औषधाची गरज नाही, धर्माची विशेष कृपा झाली की सगळं ठिक होईल. अशी अंधश्रद्धा बाळगणारे लोकच तर आयएमएचे अध्यक्ष झालेले आहेत असेही रामदेव यांनी म्हटले आहे.
कुंभला कोण बदनाम करतेय?
कुंभला कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणणाऱ्यांना विदेशातून फंड मिळतो. हे लोक हर की पौडीचे फोटो दाखवून त्याला कुंभ म्हणतायत. असे करणाऱ्यांमध्ये हिंदू विरोधी, भारत विरोधी आणि सोशल मीडियातली एक लॉबी सामिल आहे. कुंभमध्ये 99 टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये हजारपेक्षा जास्त साधू नव्हते. फक्त दोन ते तीन साधूंचा मृत्यू झाला. देशात 5 ते 7 लाख साधू आहेत, त्यापैकी 5 जणांचा करोनाने मृत्यू झाला तर कुंभने करोना पसरवला का? असा सवालही रामदेव यांनी केला आहे.