सिरियाच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बशर अल असद यांची निवड

अमेरिका व युरोपिय राष्ट्रांनी निवडणूक ठरवली बेकायदेशीर

दमास्कस  – युद्धग्रत सिरियाच्या अध्यक्षपदी बशर अल असद यांची आज सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. त्या देशातील निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले त्यात त्यांना प्रचंड मताधिक्‍य मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, ही निवडणूक बेकायदेशीर आणि धुळफेकीच्या स्वरूपातील होती अशी टीका अमेरिका व अन्य पाश्‍चिमात्य देशांनी व्यक्त केली आहे. असद यांच्या विरोधकांनीही या निवडीवर टीका केली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 1 कोटी 80 लाख मतदार पात्र होते मात्र कुर्दीश आणि अन्य बंडखोरांच्या ताब्यातील प्रांतात लोकांना मतदानासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. विस्थापित झालेल्या पन्नास लाख लोकांसह एकूण 80 लाख लोकांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या अनुपस्थितीत झालेले हे मतदान संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना धरून नव्हते असे अमेरिका आणि अन्य युरोपियन राष्ट्रांनी म्हटले आहे.

सिरियाच्या संसदेचे अध्यक्ष हम्मौद सब्बाग यांनी या मतमोजणीचा निकाल जाहीर केला. त्यात अध्यक्ष असद यांना 95.1 टक्के मतदारांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत एकूण 78.6 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे त्यांनी नमूद केले. असद यांच्या विरोधात दोन जण प्रतिकात्मक प्रतिस्पर्धी म्हणून उभे होते. त्यात त्यांनी या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. असद यांची ही निवड सात वर्षांसाठी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.