Badruddin Ajmal Controversial Statement: ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) प्रमुख आणि आसामच्या ढुबरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बद्रुद्दीन अजमल त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडले आहेत. 74 वर्षीय अजमल यांनी नुकतेच सांगितले होते की, आजही मी लग्न करण्यास सक्षम आहे. स्वत:ला ‘बलवान अजमल’ असे संबोधत ते म्हणाले होते की, माझ्यात ताकद आहे आणि मी पुन्हा लग्न करू शकतो.
सरमा म्हणाले – तुम्हाला करायचे असेल तर निवडणुकीपूर्वी करा
याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अजमल यांना पुन्हा लग्न करायचे असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी करावे, असे म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी लग्न झाले तर मी त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन कारण तोपर्यंत कायद्यानुसार वैध होईल, असे त्यांनी सांगितले. परंतु निवडणुकीनंतर समान नागरी संहिता (UCC) लागू होईल ज्यामुळे ते बेकायदेशीर ठरेल.
यूसीसी लागू केल्यानंतर अजमल यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे सरमा म्हणाले. अटकेची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. आतापर्यंत अजमल यांना एकच पत्नी आहे, पण यूसीसी लागू झाल्यानंतर त्यांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा सरमा यांनी दिला आहे. अजमल यांनी २८ मार्चला सांगितले होते त्यांना सात मुले आहेत.
मुख्यमंत्री सरमा मला लग्न करण्यापासून रोखू शकत नाहीत –
याशिवाय बद्रुद्दीन अजमल यांनी असेही म्हटले होते की, मुख्यमंत्री सरमा मला लग्न करण्यापासून रोखू शकत नाहीत. माझ्यात खूप ताकद आहे. दुसरीकडे, अजमल यांच्या या विधानाचा काँग्रेस नेते आणि ढुबरी येथील काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसैन यांनी निषेध केला आहे. बद्रुद्दीन अजमलसारख्या व्यक्तीला रमजानच्या पवित्र महिन्यात असे बोलणे शोभत नाही, असे हुसेन म्हणाले.