नवी दिल्ली – देशभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेने देशातील अनेक राज्यात हाहाकार माजवला. आता अनेक राज्यात करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. त्याचवेळी चिंता वाढविणारं वृत्त आलं असून राजस्थानमध्ये करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत.
राजस्थानमध्ये १८ वर्षे वयाच्या खालच्या युवकांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून ८५८ रुग्ण आढळल्याचे समोर आलं आहे. मागील काही दिवसांत डुंगरपूर जिल्ह्यात केवळ १० दिवसांत ५१२ मुलांना करोनाची लागण झाली. आता राज्यातील दौसा जिल्ह्यात ३४५ मुलांना करोनाची लागण झाली आहे. मागील २२ दिवसातील हे रुग्ण आहेत. सुदैवाने यापैकी एकाही युवकाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही. मात्र तिसऱ्या लाटेत करोना १८ वर्षांखालील युवकांना लक्ष्य करतो की, काय अशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान रविवारी बाडमेरमध्ये ८ वर्षांच्या मुलाला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या मुलाच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचं स्पष्ट झाला असून त्याचा एचआरसीटी स्कोर १७ आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. या परिस्थितीत राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढणार हे निश्चित मानलं जात आहे.
राजस्थानमध्ये करोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत आहे. नव्या रुग्णांचे प्रमाण १०० चाचण्यांमागे ९ एवढं खाली आहे. त्याचवेळी तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे.