गोरखपूर – देशभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेने कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त झालेत. आरोग्य सुविधांअभावी देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना अक्षरश: अनेक दवाखान्यांत चकरा माराव्या लागल्या. त्यात उत्तर प्रदेशातील स्थिती अधिकच गंभीर होती. येथे एका बेडसाठी १०० रुग्ण वेटिंगवर राहात होते, अशी माहिती समोर आली आहे.
देशातील करोना स्थिती सर्वांनाच ठावूक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील परिस्थिती सांगताना एका जिल्हाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. या जिल्हाधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेंद्र पाण्डियन यांची एका कार्यक्रमातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी काही गोष्टींची कबुली दिली. ते म्हणाले की, करोनाची दुसरी लाट फारच भयावह होती. एकवेळ अशी होती की, एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते आणि रुग्णांच्या मृत्यूची वाट पाहत होते. हे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाल्याचे सांगितले जात आहे.
पाण्डियन पुढे म्हणाले की, करोनाची परिस्थिती गंभीर असताना केवळ १० दिवसांत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात आला. अर्थव्यवस्थाही सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत लोक प्रतिनिधींना चांगलं काम केल्याचे त्यांनी म्हटलं.
दरम्यान करोनाचा उद्रेक झाल्यानंतर आरोगया व्यवस्थेचं नियोजन पूर्णपणे कोलमडले. एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते. रुग्णांच्या मृत्युची वाट पाहात होते. कारण रुग्णांचा मृत्यू झाला, तरच बेड्स रिक्त होत होते. अशी कठीण स्थिती पुन्हा येऊ नये, असं जिल्हाधिकारी पाण्डियन म्हणाले.