पुणे – करोनाग्रस्त रुग्णांना भेडसावणारा ऑक्सिजनचा प्रश्न सोडवण्यासाठी शिख बांधवांच्या वतीने मोफत ऑक्सिजन लंगर आणि ऑक्सिजन बॅंक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुरुद्वारा गुरूनानक दरबार, लष्कर येथे धर्मादाय सहआयुक्त एस. एम. बोके, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोफत ऑक्सिजन लंगर सेवेचा तसेच जम्बो ऑक्सिजन बॅंकेचा शुभारंभ करण्यात आला.
गुरुद्वारा साहिब, रोटरी क्लब ऑफ पूना आणि गुरुद्वारा पनवेल यांच्या विद्यमाने ही सेवा सुरू आहे.प्रामुख्याने ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, मात्र ते घरी उपचार घेऊ शकतात अशांसाठी ही सेवा मोफत असणार आहे. सध्या रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
पेशंटची वाढती संख्या आणि त्यातुलनेत ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा लक्षात घेऊन रुग्णालयांबरोबर गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन लंगर सेवेसह जम्बो ऑक्सिजन बॅंकेद्वारे दिलासा मिळणार, असे गुरुद्वारा दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंह सहानी यांनी सांगितले.
संतसिंगजी मोखा, नरेंद्र पाल सिंह फुल, गुरदेव सिंह राजपाल, अमरजितसिंग घई, सुरिंदर धुपर, विक्की ओबेरॉय, तर्मिंदरसिंग व्होरा, मोहिंदर कंधारी, गुरचरण कांडा, लेखराज, एम.आर. डांग, इंद्रजित सहानी उपस्थित होते.