नेक्सिको सिटी, दि. 4 – मेक्सिको सिटीतील मेट्रोचा उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 23 ठार झाले आणि तर 70 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलावरून कोसळलेल्या पुलाच्या भागाखाली दबलेल्या कारमध्ये कोणी अडकले नाही, याची खातरजमा करण्यासाठी बचाव पथकाने या कारची कसून तपासणी केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेट्रोमार्ग रस्त्यापासून 5 मीटर उंचीवर होता; परंतु मेट्रो या मेट्रोमार्गावरील मध्यमपट्टीवरून धावत होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांचे नुकसान तुलनेने कमी झाले.
पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे खाली दबलेल्या कारजवळ काम करत असलेल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी मदत आणि बचावाचे काम मंगळवारी सकाळी थांबवण्यात आले. ढिगारा हटवण्यासाठी क्रेनची मदत घेतली गेली आहे. कारमधील व्यक्ती जिवंत असण्याबद्दल महापौर क्लोदिया शेन्बाउम यांनी शंका उपस्थित केली आहे. मदत आणि बचावकामादरम्यान ढिगाऱ्याखालून काही जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 7 जण गंभीर जखमी असल्याचे आणि जखमी झालेल्या 49 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या.
मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता, ही दुर्दैवाची बाब आहे, असेही महापौर म्हणाल्या. मात्र, त्यांनी या मुलांबाबत अधिक तपशील दिला नाही.
या मेट्रोमार्गावरून मेट्रो रेल्वे नुकतीच निघून गेली होती. त्यामुळे अधिक नुकसान झाले नाही. मेक्सिको सिटीच्या मेट्रोचे उद्घाटन झाल्यापासून या मेट्रोबाबत आतापर्यंत दोन मोठे अपघात झले आहे. यातील पहिला अपघात गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. दोन मेट्रो रेल्वेची टाकुबाया स्टेशनजवळ धडक झाली होती. त्यामध्ये एक जण ठार आणि 41 जण जखमी झाले होते. तर 2015 मध्ये ओसियानिया स्टेशनवर वेळेवर न थांबलेली एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेवर धडकली होती. त्यामध्ये 12 जण जखमी झाले होते.