नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया संपताच इंधन दरवाढ झाली. त्यानुसार, मंगळवारी लिटरमागे पेट्रोल 15 पैशांनी, तर डिझेल 18 पैशांनी महागले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक म्हणजे 18 दिवसांच्या खंडानंतर ती दरवाढ झाली.
केंद्र सरकारने मागील वर्षी मार्चमध्ये इंधनांवरील करात वाढ केली. तेव्हापासून वर्षभराच्या कालावधीत पेट्रोल 21 रूपये 58 पैशांनी, तर डिझेल 19 रूपये 18 पैशांनी महागले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये चार वेळा कपात करण्यात आली. त्या कपातींमध्ये मिळून पेट्रोल 67 पैशांनी, तर डिझेल 74 पैशांनी स्वस्त झाले. अर्थात, ती दरकपात दरवाढीच्या तुलनेत नगण्य ठरली. आता पुन्हा दरवाढ झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची चिन्हे आहेत.