दिल्लीत ऑटो चालकांना पाच हजारांची मदत; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

वंदना बर्वे
नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या वतीने राजधानीतील 72 लाख लोकांना दोन महिन्यांचे राशन मोफत दिले जाणार असल्याची घोषण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली.

दिल्लीत 10 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून 72 लाख लोकांना दोन महिन्यांसाठी राशन देण्याची घोषणा केली. याचा अर्थ लॉकडांन दोन महिन्यांपर्यंत वाढविला जाईल, असे अजिबात नव्हे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गरीब जनता आर्थिक तंगीचा सामना करीत आहे. त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, दिल्लीतील सर्व ऑटोचालकांना पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. हा पैसा खात्यात जमा केला जाणार आहे. कोविडमुळे उद्‌भवलेल्या आर्थिक तंगीच्या या काळात ही मदत त्यांना मोलाची ठरणार आहे. दिल्लीत जवळपास एक लाख 56 हजार ऑटोचालक आहेत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

करोनाचा नायनाट करण्यासाठी दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी हे गरजेचे होते. यात किंचितही दुमत नाही की लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरिबांच्या रोजीरोटीवर फरक पडतो. मागच्या आठवड्यात मजुरांना 5 हजारांची मदत जाहीर करण्यात आली होती. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाचे संकट भीषण आहे. अशात आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता सर्वांनी एकमेकांना मदत करावी आणि करोनाला हरविण्यात सहकार्य करावे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.
गरीब-श्रीमंत असा भेदाभेद करू नये. ज्या रुग्णांना बेड मिळत नाही आहे त्यांना बेड कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कुणी आजारी असेल तर त्यांना जेवण देणे किंवा त्यांच्या घरापर्यंत जेवण पोहोचविण्याचे काम करून आपण त्यांची मदत करू शकतो. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले तर करोनाचा पराभव करणे अवघड जाणार नाही, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.