मेक्सिको सिटी – जगभरातील समाजशास्त्रज्ञांना माया संस्कृतीबाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर आता मेक्सिकोमध्ये माया संस्कृतीचे काही अवशेष सापडले आहेत. या माध्यमातून पंधराशे वर्षांपूर्वी माया संस्कृतीच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेक्सिकोतील काबा नावाच्या एका शहरामध्ये एक इमारत संशोधकांना सापडली असून ती माया संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत असावी असे संकेत मिळत आहेत.
इमारत आणि इतर अवशेष साधारण 1500 वर्षांपूर्वीचे असून या निमित्ताने त्या काळात कार्यरत असलेल्या माया संस्कृतीची माहिती मिळणे शक्य होणार आहे. अमेरिका आणि मेक्सिकोत ठिकठिकाणी जरी गेल्या काही वर्षापासून माया संस्कृतीचे अवशेष सापडत असले तरी मेक्सिकोमध्ये जी इमारत सापडली आहे. त्यानिमित्ताने माया संस्कृतीमध्ये लोक कशाप्रकारे राहत होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अंथ्रोपोलॉजी अँड हिस्टरी या संस्थेने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्धीला दिली असून महत्त्वाचे लोक त्या काळामध्ये अशा प्रकारच्या इमारतीमध्ये राहात असावेत अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ज्या महालवाजा इमारतीचे अवशेष सापडले आहेत ते साधारण 85 फूट रुंद असून त्यामध्ये पक्षी प्राणी यांची नक्षी कोरण्यात आली आहे. इमारतीच्या समोर एक मोठा व्हरांडा असून त्याच्यावर आठ मोठे खांब उभारण्यात आले आहेत. इमारत सुमारे 1500 वर्षांपूर्वी बनवण्यात आली असावी आणि यामध्ये या शहरावर सत्ता करणाऱ्या लोकांपैकी काही लोकांचा रहिवास असावा असे संशोधकांनी म्हटले आहे. या इमारतीची स्थापना जरी 1500 वर्षांपूर्वी करण्यात आली असली तरी ज्या शहरामध्ये ही इमारत सापडली आहे ते शहर मात्र इसवी सन पूर्व 250 ते 500 या कालावधीमधील असावे असाही संशोधकांचा अंदाज आह.