नागपूर – करोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घातलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत यांना जाळून टाकू, अशी धमकीही दिली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. या सगळ्यांदेखत बंटी शेळके यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
करोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती व नंतर मुंढे यांची नागपुरातून उचलबांगडी करण्यात आली होती.