नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीर यांनी करोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केले आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचे औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे काय?, औषधांचे वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता काय? असा सवाल कोर्टाने केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोर्टाने हा सवाल केला. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचे वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते.
औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. औषधे वाटण्यासाठीही गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतले होते का? ते कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचं वाटप करत होते? असा सवाल कोर्टाने केला आहे.
गौतम गंभीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा असल्याने त्यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या आधी दिल्ली सरकारच्या वकिलाने कोर्टात याबाबतची माहिती दिली होती. लोकांना फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता सर्रासपणे फॅबीफ्ल्यू औषधांचं मोफत वाटप करत आहे, असे या वकिलाने म्हटले होते. त्यावर हे काम चांगले आहे. पण पद्धत चांगली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.