वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताला थेट लस पुरवठा केला जाण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत.
गेल्यावर्षी जगभरात करोनाची साथ आली तेव्हा अमेरिकेने लसनिर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांशी करार करुन लसींचा मोठा साठा आपल्याकडे राहील, याची तजवीज केली होती. त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत बऱ्यापैकी लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अमेरिका करोना लसींचा अतिरिक्त साठा इतर देशांना देण्याचा विचार करत आहे. यामध्ये अमेरिका भारताचा प्राधान्याने विचार करत असल्याचे समजते.
इस्रायलनंतर अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात करोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने करोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे.
विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.