वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे पान मळ्यातील गोडाउनमध्ये शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून 100 रुग्णांची अत्याधुनिक अशा सुविधांसह सोय असणारे कोविड सेंटर उभारले जात असून ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे पूर्व हवेलीतील हे पहिलेच कोविड सेंटर आहे.
आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरीही व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी वाढू लागली आहे. ही मागणी लक्षात घेऊन हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम कडून शासनाच्या योग्य त्या परवानग्या घेऊन कोविड सेंटर ची उभारणी करण्यात येत आहे. जवळपास 100 रुग्णांची सोय असणारे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणारे कोविड सेंटर उभारले जात असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनानुसार हवेली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत असून लवकरच शासनाच्या सर्व घेऊन हे कोविड सेंटर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले आहे.
हवेली तालुक्यातील व वाघोली मधील पहिलेच कोविड सेंटर ग्रामस्थांच्या योगदानातून उभे राहिले जात असल्याचे सर्वत्र कौतुक होत असताना नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल दाभाडे आणि त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.