सुरत – करोना संसर्गाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही ज्येष्ठांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. मात्र सुरतमध्ये एका १०५ वर्षांच्या आजीने दृढ इच्छाशक्तीसह करोनाला धोबीपछाड दिली आहे.
करोनाच्या आजारावर विजय मिळवायचा सकारात्मक विचार आणि मजबूत इच्छाशक्तीगरजेची आहे. सूरतच्या 105 वर्षीय आजींनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोना माझं काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत या आजींनी कोरोना विरोधातील युद्ध जिंकलं.
सूरतच्या ऊजिबा गोंडलिया या आजींना करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे कुटुंबियांना काळजी वाटत होती. आजी मात्र जराही घाबरल्या नव्हत्या. उलट त्या सर्व नातेवाईकांना धीर देत होत्या. आरोग्य कर्मचारी देखील आजींची इच्छाशक्ती पाहून आश्चर्यचकित झाले होते. मला काहीही होणार नाही. कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही. मी लवकर बरी होऊन घरी जाईल, अस आजी डॉक्टरांना म्हणाल्या होत्या. अगदी तसच झालं अन् आजी नऊ दिवसांच्या उपचारानंतर घरी पोहचल्या.
दरम्यान करोनाला घाबरून रुग्णाची तब्येत जास्त खराब होते. मात्र आजींनी करोनाचा सामना कसा करायचा याचं उत्तम उदाहरण दिल्याचं डॉक्टर म्हणाले. आजींसारखा तणावमुक्त होऊन उपचार घेतल्यास करोनाला सहज पराभूत करता येऊ शकतं असंही डॉक्टरांनी नमूद केलं.