जयपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विवाहासाठी मंजूर झालेली रजा रद्द झाल्याने एका महिला पोलीस हवालदाराचा हळदीचा कार्यक्रम पोलीस ठाण्याच्या आवारातच पार पडला. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यावरील निष्ठेला पसंतीची दाद दिली आहे.
आशा रोठ असे या महिला हवालदाराचे नाव. करोनाच्या दुसऱ्या लाटेत तिची विवाहासाठी मंजूर केलेली रजा रद्द करण्यात आली. या साथीच्या काळात अनेकांना घरून काम करण्याची परवानगी असली तरी आघाडीच्या करोना योध्यांसाठी मात्र “रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ अशीच अवस्था या साथीने निर्माण केली आहे.
आशाच्या हळदी कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. वागड दर्शन या फेसबुक पेजवर यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अन्य महिला पोलिस कर्मचारी हळदीचे कार्यक्रम करताना दिसत आहेत. त्यात त्या हळद लावताना पारंपरिक गिते म्हणत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, आशा यांचा विवाह गेल्या वर्षी होणार होता. मात्र साथीमुळे तो पुढे ढकलला पण तेवढ्यात करोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे त्यांचे विवाहाचे नियोजन पुन्हा कोलमडले. मात्र या महिन्याच्या अखेरीस त्या विवाहबध्द होण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.