सोलापूर – सोलापुरात एका पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. प्रकाश जाधव (वय 35, राहणार – सुशीलनगर, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव आहे.
पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने सकाळ, सोलापूर तरुण भारत आणि सुराज्य दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच पोलीस असलेला भाऊदेखील करोना पॉझिटिव्ह असून आई हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार घेत आहे. रेमडीसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशला अनेक फेऱ्या मारव्या लागल्या. परंतु त्याला इंजेक्शन मिळाले नाही.
तसेच प्रकाश होम क्वारंटाईन होता. याचदरम्यान त्याने घरीच आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.