आता औषध दुकानांतही मिळेना इंजेक्शन; रुग्णांसह नातेवाईकांचेही हाल
पुणे – रेमडेसिविर रुग्णालयातही नाही आणि दुकानातही नाही; अशी स्थिती रविवारी दिवसभर झाली; त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे व्हायचे ते हाल झालेच. त्यातून संबंधित अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवल्याने आता संपर्क कोणाला करावा? हा प्रश्न रुग्णालयांना पडला. त्यामुळे त्यांनाही रेमडेसिविर मिळालेच नाही.
ज्या नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत, तेथे रेमडेसिविर उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जाहीर केले. त्यासाठी रुग्णालयांना नियमावलीही घालून देण्यात आली. त्यामुळे रिटेल बाजारातील विक्रीही बंद झाली.
आदेशाप्रमाणे रुग्णालयांना रेमडेसिविर उपलब्ध करून देणे आवश्यक होते, मात्र रुग्णालयांना ते मिळालेच नाहीत, आणि बाजारातही ते उपलब्ध नाहीत अशी स्थिती दिवसभर निर्माण झाल्याने आता काय करावे, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडला होता.
याशिवाय काही नोंदणी न झालेली छोटी रुग्णालये जी या नियमांत बसत नाहीत त्यांच्याकडे काही बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तेथील डॉक्टरांकडून नातेवाईकांना रेमडेसिविर आणायला सांगितले जाते. त्यांनाही ते मिळत नसल्याची परिस्थिती सध्या बाजारात आहे.