धुळे – राज्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरासह आता गावातही करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात 20 दिवसांत तब्बल 206 करोनाचे रुग्ण आढळले आहेत.
206 करोना बाधितांपैकी 56 रुग्ण बरे झाले असून इतर बाधित धुळे जिल्हा रुग्णालय, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय, शिंदखेडा व धुळे येथील कोविड केअर सेंटर, नंदुरबार, दोंडाईचा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, 20 दिवसात येथील 22 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापैकी रविवारी (ता.21) एकाच दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर येथील आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष नवले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, करोना सेंटर गावातच उभारण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदार सुनील सैदाणे यांच्याकडे केली आहे.