- सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
हिंजवडी – हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आयटीपार्कच्या मुख्य रस्त्यालगत विप्रो कंपनीच्या सर्कलला असलेले अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यामुळे एका कारसह पार्क केलेल्या एका दुचाकीचा चुराडा झाला आहे. अन्य दुचाकींची थोड्याफार प्रमाणात मोडतोड झाली आहे. आयटी कंपन्या बंद असल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर काही वेळाने एमआयडीसी अग्निशामक दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी होर्डिंग हटविण्याचे महत्त्वाचे काम केले. तसेच होर्डिंगखाली अडकलेल्या गाड्या अग्निशामकच्या जवानांनी बाहेर काढल्या. अग्निशामकच्या जवानांनी केबल तोडून अवघ्या एक तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याचे अग्निशामक अधिकारी सुनील इंगवले यांनी सांगितले.