नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने एका दिवसातच मुख्यमंत्री पदासाठी निवड केली आहे. तीरथ सिंह रावत आता उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता तीरथ सिंह रावत यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर तीरथ सिंह रावत म्हणाले कि, मी संघाचा प्रचारक असून त्यानंतर विद्यार्थी परिषदेत सहभागी झालो. तसेच प्रदेशाध्यक्ष पदही भूषवले आहे. मला ज्या जबाबदारी मिळल्या त्या मी पूर्ण केल्या. पुढेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
तसेच, त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केलेली कामे याआधी कधीही झालेली नव्हती, असे कौतुकही तीरथ सिंह रावत यांनी माजी मुख्यमंत्र्याचे केले. आजही त्रिवेंद्र सिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोण आहेत तीरथ सिंह रावत?
तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते उत्तराखंड भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिवही आहेत. त्याशिवाय भाजपच्या राज्यस्तरावरील अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे.