समान पाणीपुरवठा : आतापर्यंत तब्बल 35 वेळा दिली नोटीस
कामात दिरंगाई केल्याने कारवाईचा बडगा
पुणे – समान पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई आणि पालिकेच्या अटींचे उल्लंघन एल अँड टी कंपनीच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी पालिकेने दंडात्मक कारवाई करत कंपनीकडून दरदिवशी कामाच्या दिरंगाईपोटी तब्बल 1 लाख 21 हजार रुपयांचा दंड आकारणी सुरू केली आहे. शिवाय कामाच्या सल्लागारावरही कारवाई करण्यात आली आहे.
शहरात चोवीस तास समान पाणी पुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. यात 83 पाणी टाक्या उभारणे, सुमारे 1,600 किलोमीटरची जलवाहिनी टाकणे, सुमारे सव्वातीन लाख पाणीमीटर बसवणे अशी केली जात आहेत. यासाठी सुमारे 2,520 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामातील जवळपास 80 टक्क्यांपेक्षा अधिक काम एल अँड टी कंपनीकडे आहे.
योजना मोठी असल्याने तसेच कामास उशीर झाल्यास त्याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कालबध्द्ध कृती आराखडा तयार करून काम देण्यात आले. त्यासाठी संबंधित कंपनीस मुदतही ठरवून देण्यात आली. पण, ही योजना रेंगाळली आहे. याबाबत महापालिकेने कंपनीला तब्बल 35 वेळा खुलासा नोटीस बजावली. कंपनीकडून आलेले सर्व खुलासे प्रशासनाने फेटाळले.
तसेच कामात सुधारणा न झाल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारला. कंपनीला पाणीमीटर, पाइपलाइन या वेगवेगळ्या कामांसाठी दि. 1 नोव्हेंबरपासून प्रत्येक दिवसाला 1 लाख 21 हजारांचा दंड लागू केला आहे. तर, सल्लागाराला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दंड करताना; मीटर बसवताना जनजागृती न करणे, खोदाईची कामे व्यवस्थित न करणे, ग्राहकांशी चर्चा न करणे, अर्धवट व निकृष्ट मीटर बसवणे अशी कारणे देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.