गुरुग्राम – १३ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर अमित मिश्रा यांनी जेलमध्ये कमाल केली आहे. तुरुंगवासाची शिक्षा भोगताना अमित यांनी भारतीय तुरूंग हायटेक बनवण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरची आता सर्वोच्च न्यायालयानेही दाखल घेत अमित मिश्रा यांचे कौतुक केले आहे.
कोण आहे अमित मिश्रा?
काही वर्षांपूर्वी अमित मिश्रा यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांना १३ महिन्यांसाठी हरयाणामधील ग्रुरुग्राममधील तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. एका वर्षानंतर अमित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु, तुरुंगात असताना अमित यांनी एक खास सॉफ्टवेअर विकसित केले.
काय आहे त्यांचे सॉफ्टवेअर?
आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सामान्यपणे कोणालाही सुनावण्यात आल्यानंतर मृत्यूपर्यंत ती व्यक्ती तुरुंगामध्येच असते. पण अशा व्यक्तींना राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला १४ वर्षांनंतर सोडून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासंदर्भातील निर्णय तुरुंगामधील वागणुकीच्या आधारे घेतला जातो. अमित यांनी बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही कैद्यासंदर्भातील रियल टाइम एन्ट्री करता येते. म्हणजेच हा कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची सॉफ्टवेअरच्या मदतीने नोंद ठेवता येणार आहे. फिनिक्स असे नाव या सॉफ्टवेअरला देण्यात आले आहे.
हे सॉफ्टवेअर सध्या हरियाणा १९, राजस्थानमधील ३८, उत्तर प्रदेशमधील ३१ आणि हिमाचल प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतील जात आहे.
दरम्यान, न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांनी अमितने बनवलेले सॉफ्टवेअर पहावे, असा सल्ला दिला. हे सॉफ्टवेअर तुरुंगांमधील सुधारणांसाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळेच केवळ हरयाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.