राहून गेलेलं काही…

मी जर एखादी लिस्ट बनवायची ठरवलं ना की, ह्या ह्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, किंवा करायला हव्या होत्या, पण आता ते शक्‍य नाही; तर चार पाच पानं तर सहज होतील.

आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट आपल्या हातात नसते, विधाता सगळं काही आपल्याकडून करवून घेत असतो. पण तरीही कितीतरी वेळा असं होतं की, आपल्यासमोर अनेक पर्याय असतात आणि आपण चुकीचा, किंवा केवळ अगदी तडजोड म्हणून किंवा समोरच्याला वाईट वाटायला नको म्हणून एखादा पर्याय निवडतो, जो नसतो आपल्या आवडीचा, आपल्याला हवा तो. पण हेच तर आयुष्य असतं ना? कडू, गोड,आंबट, खारट अशा अनेक अनुभवांचं, ज्यांच्याशिवाय जगण्याला खरा अर्थ प्राप्त होत नाही.

लहानपणी रात्री झोपताना आई मला विचारायची, माझ्याजवळ झोपणार की कडेला? कडेला झोपलं तर पंख्याचा छान वारा लागायचा, पण आई नसायची बाजूला. मग काय माझी मोठी बहीण मस्तपैकी ताणून द्यायची पंख्याचा वारा खात आणि मी आईच्या कुशीत असूनही लांबूनच पंख्याकडे रागाने बघत जायचे कधीतरी रात्री झोपी.

शाळेत आपण परीक्षेत एखादा पेपर सोडवायचो. तेव्हा पेपरमध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा असे प्रश्‍न असायचे आणि त्याला पर्यायही असायचे. एखादा पर्याय मनात धरून, उत्तर लिहिताना मात्र आपण भलतंच लिहायचो. नंतर कळायचं की, जो पहिला पर्याय आपल्या मनात आलेला तोच बरोबर होता, आणि आपला एक गुण जातो केवळ निर्णय चुकीचा घेतल्यामुळे. पण का चुकतो आपण? वेळ कमी पडतो, गोंधळतो, एखाद्या उत्तरावर ठाम नसतो ह्यामुळे? की आपला अभ्यास किंवा एकाग्रता कमी पडली म्हणून? कारण काहीही असो, बरोबर उत्तर लिहिणं राहून जातं आणि हळहळ मात्र मागे उरते.

आपल्या आयुष्यात अनेक बाबतीत असंच घडत जातं पुढेपुढे, जिथे वाटत राहतं, अरे राहून गेलं ते करायचं आणि भलतंच केलं! अगदी नोकरी, लग्नात जोडीदार निवडणं या महत्वाच्या बाबतीतही! मी दहावी नंतर वाणिज्य शाखेऐवजी कला शाखा निवडायला हवी होती. म्हणजे तेव्हा साधारण आपण सरसकट सगळीच जणं मोठ्या भावंडांच्या पावलावर पाऊल ठेवत, डोळे झाकून त्यांनी जी शाखा निवडली तीच निवडायचो. म्हणजे तसे काही विज्ञान शाखा घ्यावी असे गुणही मिळाले नव्हते आणि कला शाखेला नोकरीसाठी पर्याय कमी म्हणून वाणिज्य शाखा हा उत्तम पर्याय निवडला आणि बी कॉम झाले. पण आत्ताची वाचन, लिखाण ह्याची आवड आणि आपलंच लिखाण बघता, कला शाखा घेतली असती तर वेगळंच काहीतरी घडलं असतं, असं सतत वाटत राहतं मनाला. पण जे काही शिकायला मिळालं ते आत्मसात करत गेले आणि आता ते मांडायचाही प्रयत्न करत आहे.

आपण बायका किंवा मुलीसुद्धा, ड्रेस किंवा साडी आणायला दुकानात जातो. दुकानदाराला भारंभार कपडे दाखवायला लावतो. “तो इंग्लिश कलर दाखवा, ह्या कलरमध्ये ही प्रिंट दाखवा,’ असं करत एकदोन तास खर्ची घालून एखादा ड्रेस घेऊन घरी येतो. तो ड्रेस लगेच घालून बघतो. आणि आरशात बघून म्हणतो की, “अरेरे, तो आधी बघितला होता गुलाबी रंगाचा ड्रेस किंवा साडी ह्याच्यापेक्षा उठून दिसले असते.

एक गंमतीचा भाग बरं का! पण प्रेम करायचंसुद्धा राहून गेलं माझं. ते सोळाव्या वर्षी होणारं, मनाला हुरहूर लावणारं, एखाद्याची वाट बघायला लावणारं. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारं. ते म्हणे फुलपाखरं वगैरे भिरभिरतात प्रेमात असलं की! खाणंपिणंसुद्धा विसरून जातो माणूस प्रेमात. असं जगाला आणि स्वतःला विसरायला लावणारं प्रेम राहिलं हो करायचं! लग्न झालं, नवरा उत्तमच आहे, प्रेमही आमचं एकमेकांवर, पण त्या प्रेमाची नशा काही औरच नाही का?
कधी निर्णय चुकतो, कधी परिस्थिती चुकीची असते, कधी कुणाच्या मनाखातर तर कधी लाजेखातर, कधी अजाणतेपणी तर कधी जाणूनबुजून काही गोष्टी करायच्या राहून जातात.

पण काही गोष्टी सुधारता येतात, काही करतासुद्धा बरं का? म्हणजे गाणं शिकायचं होतं, नाच आवडायचा, चित्रकला सुंदर होती माझी, तर शिका, ते आत्मसात करा, त्यात पारंगत व्हा, अगदी शिक्षण घ्यायला सुद्धा वय नसतं. तर ह्या राहून गेलेल्या गोष्टी करायला देवाने तुम्हाला जे सुदंर आयुष्य दिलेलं आहे ना; त्याचा सदुपयोग करा आणि हळहळ कमी करा, काय जमेल ना? जमायलाच हवं!

– मानसी चापेकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.