सातारा (प्रतिनिधी) – जमीन विकून आलेले पैसे देत नसल्याच्या कारणाने मित्रांच्या मदतीने वडिलांचा खून केल्या प्रकरणी मुलगा त्याच्या दोन मित्रांना पुसेगाव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपत गुलाब सत्रे (वय 55, रा. दरजाई, ता. खटाव) यांचा मंगळवारी (दि. 16) रात्री खून झाला होता. याप्रकरणी संपत सत्रे यांचा मुलगा पवन (रा. दरजाई, ता. खटाव) आणि त्याचे मित्र सौरभ अशोक कदम, युवराज मोहन जाधव (रा. वडूज, ता. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, संपत सत्रे हे मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातून पाऊलवाटेने घरी परतत असताना त्यांचा खून झाला होता. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेचे साक्षीदार मिळत नसल्याने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुसेगाव पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याची सूचना दिली होती. दरम्यान, स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पवन सत्रे याला चौकशीसाठी बोलावून घेतले. त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
विकलेल्या जमिनीचे पैसे वडील खर्चासाठी देत नसल्याच्या रागातून मित्रांच्या मदतीने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केल्याचे पवनने सांगितले. दगडावर पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी त्यांच्या डोक्याखाली दगड ठेवल्याची कबुलीही त्याने दिली.
एसपी बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि विश्वजित घोडके, आनंदसिंग साबळे, फौजदार बाळासाहेब लोंढे, सहाय्यक फौजदार तानाजी माने, आनंदराव जगताप, सुधीर बनकर, चंद्रहार खाडे, सचिन खाडे, आनंदराव गंबरे, अर्जुन शिरतोडे, मयूर देशमुख, संकेत निकम, संजय जाधव, पुष्कर जाधव, सचिन जगताप, सचिन माने, गणेश मुंढे, इम्तियाज मुल्ला, सुनील अबदागिरी यांनी ही कारवाई केली.