भालेकर करंडक क्रिकेट : संयुक्त जिल्हा व केडन्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे – पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत संयुक्त जिल्हा व केडन्स या संघांनी अनुक्रमे पीवायसी हिंदू जिमखाना व 22 यार्डस हा संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत उपांत्य फेरीत च्या लढतीत अभिषेक पवार (116 धावा) याने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 89 धावांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना संयुक्त जिल्हा संघाने 45 षटकात 5 बाद 301 धावाचा डोंगर उभा केला.

यात अभिषेक पवारने 96 चेंडूत 7 चौकार व 9 षटकाराच्या मदतीने 116 धावा व सचिन धसने 85 चेंडूत 14 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 105 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 141 चेंडूत 188 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 45 षटकात 9बाद 212 धावांवर संपुष्टात आला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हर्षल काटे ( 70धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 22 यार्डस संघाचा 93 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 6 बाद 294 धावा केल्या. यामध्ये अर्शिन कुलकर्णी (74 धावा) व प्रद्युम्न चव्हाण (44 धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 104 चेंडूत 88 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. याच्या उत्तरात 22 यार्डस संघाचा डाव 41.1 षटकात 201 धावावर आटोपला. यामध्ये तेजस तोलसणकरने एकाबाजूने लढताना 97 धावांची खेळी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.