मुंबई – लाखो रुपयांचा ऍडव्हान्स घेऊनही कार्यक्रमाला दांडी मारल्याने अभिनेत्री सनी लिओनी चर्चेत आली होती. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केल्याने ती खूपच संतापली होती. मात्र आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत सनीने आयोजकांचे दावे फेटाळले.
संबंधित करारामध्ये वेळेत पेमेंट मिळाले नसल्याचा दावा सनीने केला आहे. तसेच केरळ पोलिसांनी तिरुअनंतपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये सनीची चौकशी केली होती. त्यानंतर कोचीतील इव्हेंट मॅनेजरने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
केरळमध्ये उद्घाटन समारंभांना हजेरी लावण्याचे आश्वासन देत अभिनेत्री सनी लिओनीने 29 लाख रुपये घेतले. मात्र कार्यक्रमांना ती उपस्थितच राहिली नाही, अशी तक्रार इव्हेंट मॅनेजर आर. शियास यांनी दाखल केली होती. 2019 मधील कार्यक्रमासाठी हे मानधन घेतले गेल्याची माहिती आहे. मात्र इव्हेंट मॅनेजरने चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप सनीने केला आहे.
मी तपास अधिकाऱ्यांना माझा जबाब दिला आहे आणि ते तक्रारदार समन्वयकांचीही चौकशी करत आहेत, असे सनीने सांगितले. दरम्यान, सध्या ती तिरुअनंतपुरममध्ये एमटीव्ही स्प्लिट्सविला या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहे.