माद्रिद – जागतिक स्तरावरील स्टार खेळाडू असलेल्या लिओनेल मेस्सीने बार्सिलोनासाठी विक्रमी 650 वा गोल नोंदवून संघाला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ऍथलेटिक बिलबाओ क्लबवर 2-1 असा विजय मिळवून दिला.
काही दिवसांपूर्वीच स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍथलेटिक क्लबने बार्सिलोनावर 3-2 अशी सरशी साधली होती. या लढतीत मेस्सीला कारकिर्दीत प्रथमच लाल कार्ड दाखवण्यात आले होते. परंतु रविवारी अखेर मेस्सीसह बार्सिलोनाने त्या पराभवाची परतफेड करताना गुणतालिकेच्या दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बार्सिलोनासाठी मेस्सीने 20 व्या मिनिटाला फ्री-कीकद्वारे पहिला गोल नोंदवला. त्यानंतर जॉर्डी अल्बाने 49 व्या मिनिटाला स्वयंगोल केल्यामुळे ऍथलेटिक क्लबने बरोबरी साधली.
मात्र ऍन्टोइन ग्रीझमनने 74 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बार्सिलोनाचा विजय साकारला. बार्सिलोनाचे या विजयासह 20 सामन्यांतून 40 गुण झाले आहेत. ऍटलेटिको माद्रिद 19 सामन्यांतील 50 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.