दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्याला धडकी भरणारा ठरणार का हे पाहणे उत्सुक्याचे
इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार व अजित पवार यांच्या गटाने मागील काही दिवसापूर्वी इंदापूर येथे शक्तीप्रदर्शन करत मेळावे गाजवले, राज्यभर या मेळाव्याची चर्चा झाली. मात्र भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मेळावा घेतला नाही. मात्र येणार्या काही दिवसात भाजपचा जोरदार मेळावा माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याने झालेल्या दोन मेळाव्यांचे रेकॉर्ड भाजपचा मेळावा मोडेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मेळावे पार पडले. या कालावधीत ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हर्षवर्धन पाटलांनी खरपूस समाचार घेतला. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील राजकीय संबंध प्रचंड ताणले गेले. मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात घेत, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत, मुंबई येथील तब्बल दोन बैठकीत मनोमिलन केले. त्यामुळे सद्यस्थितीत भाजप व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट एकमेकांवर चिखलफेक करण्याची भूमिका बंद झालेली आहे.
इंदापूर हे तालुक्याचे ठिकाण असणार्या शहरात अजित पवार गटाने व शरद पवार गटाने, शक्ती प्रदर्शन करत हम किसीसे कम नही असा राजकीय संदेश दिला आहे. त्यामुळे आगामी काळात होणारा भाजपचा मेळावा या दोन मेळाव्यांना धडकी भरवणारा ठरणार का अशी चर्चा रंगली आहे.
राजकीय प्रश्न पक्षश्रेष्ठीच्या गळी उतरवणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा फिक्स झाल्यामुळे इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पूर्ण ताकतीने काम करणार हा संदेश मात्र सर्व दूर पोहोचला आहे. आपल्या नेत्याच्या उपस्थितीत भाजपच्या होणार्या मेळाव्याच्या निमित्ताने आपले राजकीय प्रश्न पक्षश्रेष्ठीच्या गळी उतरवणार हे मात्र निश्चित!