सातारा – वाई हत्याकांड प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात शुक्रवारी पुन्हा उलटतपास झाला. गेल्या चार तारखांपासून उलटतपास सुरु असून तो आणखी सुरु राहणार असल्याची माहिती बचाव पक्षाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, उलट तपासात प्रश्नांची सरबत्ती झाल्याने त्यातील अनेक प्रश्नांना माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिने ‘मला आठवत नाही,’ असा पाढा वाचला.
डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील सहा महिला, पुरुषांचे खून केले आहेत. खून केल्यानंतर सर्व मृतदेह धोम धरणा लगत असलेल्या त्याच्या फार्म हाऊस मध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्या नंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्याकांड केला याचा पाढा वाचला.
या खटल्याची शुक्रवारी नियमित तारीख होती. न्यायालयात संशयित आरोपी डॉ.संतोष पोळ, माफीची साक्षीदार ज्योती मांढरे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, बचाव पक्षाचे वकील श्रीकांत हुटगीकर उपस्थित होते. गेल्या तीन तारखांपासून न्यायालयात उलटतपास सुरु आहे. शुक्रवारी पुन्हा उलटतपासच झाला.
बचाव पक्षाकडून माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले. यामध्ये प्रामुख्याने सीडीआर, संपर्क, नेमके खून कोणी किती केले? विविध झालेले पंचनामे, त्यातील तारखा अशा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. दरम्यान, यातील अनेक प्रश्नांना ज्योतीने माहित नाही, आठवत नाही, अशी उत्तरे दिली.
शुक्रवारी दोन टप्प्यात खटल्यातीव उलटतपास झाला. या सुनावणीची पुढील तारीख 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अद्याप उलटतपास पूर्ण झालेला नसून तो सुरुच राहणार असल्याची माहिती अॅड. हुटगीकर यांनी दिली.