दिल्ली हिंसाचार हा पूर्वनियोजित कट – संजय राऊत

मुंबई, – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा केंद्र सरकारने आखलेला पूर्वनियोजित कट आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती जर कमी करायची असेल तर सरकारला आंदोलन बदनाम करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा वापर करण्यात आला. आता केंद्र सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, कारण भाजपशी संबंधित एका गटाने हा हिंसाचार घडवल्याचे समोर आले आहे.
त्या ठिकाणी लाखो शेतकरी असताना, शेतकऱ्यांचा एक गट त्या ठिकाणाहून बाहेर पडतो आणि त्याचं नेतृत्व हे भाजपशी संबंधित व्यक्ती करतो. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला, असे सांगत राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन हे शांततेत सुरु होते. देशातील नागरिकांची सहानुभूती त्याला होती. शेतकऱ्यांना मिळणारी ही सहानुभूती जर कमी करायची असेल तर हे आंदोलन बदनाम करायची गरज होती. त्याला बदनाम करण्यासाठी मग कट रचण्यात आला. त्या ठिकाणी राष्ट्रवाद आणण्यात आला. तिरंग्याचा अपमान झाल्याचे सांगण्यात आले. हे नेहमीचे हातखंडे वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





