राजकीय द्वेष, उधळपट्टी, सुपारीबहाद्दर…अशा आक्रमक शब्दांत ‘ते’ एकमेकांविरुद्ध भिडले

– विनोद मोहिते
इस्लामपूर (सांगली) – नगरपालिकेची शुक्रवारी झालेली सभा वादळी झाली. सभेत नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी, अवास्तव, विसंगती, राजकीय सूड, सुपारीबहाद्दर, राजकीय द्वेष, अशा आक्रमक शब्दांत सत्ताधारी आणि विरोधी गटात चांगलीच जुंपली. एक-मेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने सभागृहात गोंधळ उडाला. मान-अपमान नाराजी नाट्यांनंतर आक्षेपार्ह शब्द सभेच्या कामकाजातून वगळ्याचा आदेश नगराध्यक्षांनी दिला.
राजारामबापू पाटील नाट्यगृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री आठ वाजता सभा तहकूब केली गेली. उद्या शनिवारी सकाळी सभेचे उर्वरीत कामकाज सुरू असणार आहे.
वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईचे सर्व अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय इस्लामपूर नगरपालिकेच्या सभेत सर्वानुमते देण्यात आला. शहराचे विद्रुपीकरण करणारे रस्त्यावरील दुकानांचे फलक व अवैध अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.
नो-डिजिटल झोन ठिकाणी डिजिटल लावणाऱ्या वर कारवाई करणे, शहरात वाहतुकीच्या मार्गालगत असणाऱ्या बँकांच्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर अस्ताव्यस्त असतात. अशा संस्थांना नोटीस देण्याचे ठरले. संभाजी चौकातून सावकार कॉलनीत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घराची जागा संपादन व अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला. माजी सैनिक, विधवा जवानांच्या पत्नी यांच्या मालमत्ता करातील संकलीत कर माफ करण्याचा निर्णय झाला.
राजारामबापू व्याखानमालेच्या खर्चाच्या मान्यतेवरून सत्ताधारी विकास आघाडी,शिवसेना आणि विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. जनेतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप शकील सय्यद यांनी केला. याच मुद्यावरून नगरसेवक वैभव पवार, अमित ओसवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वास डांगे, संजय कोरे, संग्राम पाटील यांनी बचावात्मक भूमिका मांडली. शहाजी पाटील यांनी अवास्तव खर्चाला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. तीन दिवसांच्या व्याख्यानमालेसाठी तब्बल ६ लाख ४३ हजार १६७ रुपये खर्च झाला आहे.
यात सर्वाधीक खर्च फोटोसाठी झाला आहे. या विषयांवर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक शकील सय्यद यांनी तालुका वाचनालय व्याख्यानमालेसाठी तीन दिवसांसाठी अवघे लाख रुपये खर्च होतात. मग इथं ज्यादा कसा ? असा प्रश्न उपस्थित केल्यावर नगरसेवक संग्राम पाटील यांनी “आपण कोणाची सुपारी घेवू नका.
खंडणीबहादूर बनू नका असे सुनावले. दरम्यान राजकीय द्वेषापोटी विरोध करू नका या राष्ट्रवादीने केलेल्या आरोपाचे जोरदार खंडन विकास आघाडी शिवसेनेने कडून करण्यात आले. अखेर अवास्तव खर्च कमी करावा आणि दुरुस्ती करून बिले मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थगित केलेल्या इतिवृत्त विषयाच्यावरून सत्ताधारी व विरोधकांत गदारोळ झाला. बोगस सुरक्षा रक्षक उभा करून घरच्यांच्या नावे पगार काढणाऱ्या सुरक्षा कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली. तर नव्याने सुरक्षा रक्षक नेमताना ठेका न देता पालिका कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात अशी मागणी करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्कींग बाबतचे धोरण ठरवण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
नगरपालिका प्रशासनासह विविध विभागाच्या वार्षिक निविदा मंजूर करण्यात आल्या. स्वच्छता व आरोग्य ठेकेदारांकडून स्वच्छता कामात सुधारणा व्हावी नगरसेवकांच्याशीं संपर्क करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य सभापती विश्वास डांगे, बांधकाम सभापती सुनीता सपकाळ, जयश्री माळी, संगीता कांबळे आनंदराव पवार, प्रदीप लोहार,प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.





