नवी दिल्ली – लसीकरणाचे श्रेय आरोग्य कर्मचारी आणि लस अल्पावधीत विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांचेच आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी आज या सर्वांचा गौरव केला. वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेच्या लाभार्थी आणि लस देणाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निम-वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयांमधील स्वच्छता कर्मचारी आणि करोना लसीशी संबंधित प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या.
आज जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यात 30 कोटी देशवासियांना लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आज भारत जगाच्या या सर्वात मोठ्या गरजेबाबत पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि भारत अनेक देशांना मदत देखील करत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात वाराणसी व आजूबाजूच्या परिसरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील बदलाची दखल घेतली. वाराणसीमध्ये 20 हजाराहून अधिक आरोग्य व्यावसायिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी 15 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या व्यवस्थेबद्दल कौतुकही केले.
लसीकरण मोहिमेबाबत काही समस्या असल्यास त्या जाणून घेणे हा आजच्या संवादाचा उद्देश होता. पंतप्रधानांनी मेट्रन, “एएनएम’ कामगार, डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्याप्रति देशाची कृतज्ञता व्यक्त केली. भिक्षूसमान समर्पणाबद्दल पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे कौतुकही केले.
स्वच्छता अभियानात केलेल्या उपाययोजनामुळे साथीच्या रोगाचा सामना करण्यास देश अधिक सज्ज झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. लसीकरणाच्या विश्वासार्ह अंमलबजावणीबद्दल पंतप्रधानांनी करोना योद्ध्यांची प्रशंसा केली.