मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ( Australian Open ) स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल 47 टेनिसपटूंना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले असले, तरी नव्या वर्षात ग्रॅंड स्लॅम मालिकेतील पहिली ऑस्ट्रेलिन स्पर्धा नियोजीत वेळापत्रकानुसार पार पडतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे प्रमुख क्रेग टिले यांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या विविध भागातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. विशेष म्हणजे काही खेळाडू अशाच विमानामधून येत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी वाढली आहे. लॉस एंजेलिसवरून 24 खेळाडू आले असून, ते थेट हॉटेलमध्ये गेले आहेत. हे खेळाडू आलेल्या विमानातील एक सेवक पॉझिटिव्ह आढळला आहे.
त्याचबरोबर प्रसारण कंपनीचा एक प्रतिनिधी पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर आबु धाबीवरून आलेल्या विमानातील काही प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या विमानातून 23 खेळाडू प्रवास करत होते. त्यामुळे या खेळाडूंनाही हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही विमानातून आलेल्या खेळाडूंशी आम्ही सातत्याने संपर्क साधून आहोत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असे क्रेग टेली यांनी सांगितले.
या दोन्ही विमानातून आलेल्या व्यक्तींना थेट आरोग्य हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आता 47 खेळाडूंना चौदा दिवस हॉटेल सोडता येणार नाही. त्यानंतरही हे खेळाडू चाचणीच निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. या खेळाडूंना या चौदा दिवसात सरावाची परवानगी मिळणार नाही.