फलटण ( Gram Panchayat Results 2021 ) – फलटण तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून बहुतांश ग्रामपंचायतींवर राजे गटाने वर्चस्व राखले आहेत. डोंबाळेवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व फलटण तालुक्यात असल्याने त्यांच्या गटाकडे इच्छुकांची गर्दी होती. अनेक गावांमध्ये राजे गटांतर्गत दोन-तीन पॅनेल पडण्याची शक्यता होती. बंडाळी होऊ नये म्हणून स्वतः रामराजे यांनी अनेक इच्छुकांशी चर्चा करून नाराजी राहू नये, याची काळजी घेतली होती. त्यामुळे बंडखोरी काही प्रमाणात टळली.
दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार गटानेही संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत दिसत होती. विंचुर्णी, तामखडा, फरांदवाडी या ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. भाजपच्या ताब्यातील निंभोरे ग्रामपंचायत राजे गटाने खेचून आणली आहे.
राम निंबाळकर यांच्या गटाने निंबळकमध्ये वर्चस्व राखले आहे. ना. रामराजे यांनी विशेष लक्ष घातलेल्या साखरवाडी ग्रामपंचायतीत विक्रम भोसले यांच्या पॅनेलने जबरदस्त झुंज देत 17 पैकी 8 जागांवर विजय मिळवला असून राजे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे दोन जागांवर पाटील गटाचे उमेदवार निवडून आल्याने, गावचा सरपंच पाटील गटच ठरवणार, असे चित्र आहे. कोळकीमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे.
या निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लक्ष घातले होते. त्यांचे दिग्गज कार्यकर्ते सक्रिय होते; परंतु भाजपपुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या सर्व उमेदवारांची सपशेल धुलाई झाली आहे. दुसरीकडे राजे गटाच्या उमेदवारांना यश आले असले, तरी अनेक बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग 6 मध्ये राजे गटाच्या तुषार नाईक निंबाळकर यांच्यासाठी स्वत: संजीवराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे व विश्वजितराजे यांनी प्रचार केला होता, तरीही मतदारांनी त्यांना नाकारले आहे.
याच प्रभागातील राजे गटाचे बंडखोर कार्यकर्ते बबलू निंबाळकर यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी निंबाळकर यांचा विजय लक्षवेधी ठरला आहे. गुणवरे ग्रामपंचायतीत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव विजयी झाले आहेत. निंभोरे ग्रामपंचायतीत रामराजे यांचे स्वीय सहाय्यक मुंकुंद रणवरे विजयी झाले आहेत, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते अमित रणवरे पराभूत झाले आहेत.
दरम्यान, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 90 पैकी 78 ग्रामपंचायतींवर ना. रामराजे यांच्या गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचा दावा माहिती जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.