मुंबई – देशभरात करोना प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात करोनायोद्ध्यांना लस देण्यात आली आहे.यामध्ये ४४७ जणांवर लसीचा साईड इफेक्ट झाला आहे. यातील तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर महाराष्ट्रातही नगरमधील ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा त्रास झाल्याचे समजत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत दोन लाख २४ हजार ३०१ करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात आले. यापैकी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लस घेतलेल्या एकूण ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
परंतु, इतर ४४४ जणांना ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच मोहिमेतील अडथळे आणि नियोजनातील त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
करोना लस घेतल्यानंतर नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्रास झाला. खबरदारीचा उपाय म्हणून तीन आरोग्य सेविकांवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.