टोकीयो – ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेले हे चारही रुग्ण ब्राझीलमधील ऍमेझॉन राज्यातून टोकीयोमध्ये परतले होते.
करोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधून देशात दाखल झालेल्या चार जणांमध्ये करोनाचे नवीन विषाणू आढळून आले आहेत. मात्र हे विषाणू ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनच्या करोना विषाणूसारखे नसून त्याहूनही वेगळे आहेत.
या नवीन प्रकारच्या विषाणूचा स्ट्रेन हा यापूर्वी आढळून आलेल्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी खूप साधर्म्य असणारा आहे. एनआयआयडीने रविवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये या नव्या स्ट्रेनच्या संसर्गासंदर्भातील माहिती देताना या विषाणूमधील बदल हा मर्यादित आहे.
मात्र हा विषाणू किती संसर्गजन्य आहे हे ठोसपणे आताच सांगता येत नसलं तरी तो इतर दोन स्ट्रेन इतकाच संसर्गजन्य असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या विषाणूचा संसर्ग होण्याचा वेग आणि त्यावर लसीचा परिणाम होईल की नाही हे संशोधनानंतरच स्पष्ट होणार असल्याचं एनआयआयडीच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.