नवी दिल्ली – येत्या १६ जानेवारीपासून देशभरामध्ये करोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील करोना लसीकरणाची मोहीम कशी असेल? पहिल्या टप्प्यात कोणा-कोणाला लस देण्यात येईल? लसीकरणाचा दुसरा टप्पा कसा असेल? लसीकरणाचे पैसे केंद्र सरकार भरेल की त्याचा बोजा राज्य सरकारांना उचलावा लागेल? याबाबतची सर्व माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत दिलेली माहिती –
- येत्या १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरणास सुरुवात होईल, यामध्ये भारतात बनवलेल्या दोन लसी वापरण्यात येतील.
- पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी आरोग्यकर्मींना लस देण्यात येईल. सफाई कामगार, फ्रंटलाईन वर्कर्स, सैन्य दलातील कर्मचारी, पोलीस, व निमलष्करी कर्मचाऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल.
- पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्यकर्मी व फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात येईल. यानांतच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक व इतर व्याधी असलेले ५० वर्षांखालील नागरिक यांचे लसीकरण होईल. दुसर्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस देण्यात येईल.
- या ३० कोटी लोकांचे लसीकरण आपण पुढील काही महिन्यांमध्ये करणार आहोत.
- ३ कोटी आरोग्यकर्मी व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केंद्र सरकारमार्फत केले जाणार असून यासाठी राज्य सरकारला कोणताही खर्च करावा लागणार नाही.