वाई (प्रतिनिधी) – वाई शहरातील सामाजिक, राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या रविवार पेठेतील यंग रविवार सरकार ग्रुपच्या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. वाई पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीच्या या धक्कातंत्राने वाईतील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात भाजप व कॉंग्रेसपुढे अडचणी येणार असल्याचे दिसत असून भाजप व कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे माजी आमदार व सद्य स्थितीत वाई मतदारसंघातील भाजपचे सर्वेसर्वा मदन भोसले यांचे कट्टर समर्थक व वाईतील राजकीय झंझावात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेवकाच्या निकटच्या सरकार ग्रुपमधील मावळ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर येत्या काळात संबंधित सेनापतीची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे.
आ. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत वाईतील आजी-माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस, भाजपला दिलेले राजकीय भूकंपाचे आणखी हादरे लवकरच बसणार आहेत.
आ. पाटील यांचे वाईतील विश्वासू सहकारी व नगरसेवक संग्राम उर्फ पप्पू पवार, भारत खामकर, धनंजय बनकर, माजी नगरसेवक बापू जमदाडे, श्रीधर भाडळकर, केदार काटे, सतीश मोहिते यांच्या प्रयत्नांमुळे यंग रविवार सरकार ग्रुपचे अध्यक्ष तुषार काळे, गणेश गुरव, हेमंत येवले, समीर केकडे, मिथुन करंजे, संतोष रजपूत, समीर चौधरी, गजानन जाधव, अनिल नेवसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने आगामी पालिका निवडणुकीत रविवारी पेठेमधील राजकीय चित्र वेगळे असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.