महाबळेश्वर : विहिरीत पडलेल्या गव्याला वाचविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू

पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वरजवळ लिंगमळा येथील ग्रीनवूड सोसायटीच्या खाजगी जागेतील विहिरीत एक रानगवा रविवारी दुपारी पडला. महाबळेश्वर ट्रेकर, वन विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक या गव्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यात यश आले नव्हते. 

महाबळेश्वरनजीक लिंगमळा येथे रानगवे मोठ्या संख्येने आढळतात. तेथील ग्रीनवूड सोसायटीच्या खाजगी जागेतील विहिरीत एक गवा रविवारी दुपारी पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना याबाबत कळविले असता, सुनील भाटिया यांची संपूर्ण टीम ग्रीनवूड सोसायटीत दाखल झाली.

गव्याला बाहेर काढण्यासाठी वाईतून हायड्रोलिक क्रेन मागवण्यात आली. वन विभागाचे विशेष पथक कोल्हापुरातून घटनास्थळी दाखल झाले. रानगव्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वन कर्मचारी व महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे सदस्य रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते.

राज्यात अनेक ठिकाणी रानगवे वाट चुकून शहरी भागात दाखल होत असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांमध्ये येत आहेत. पुणे शहरात चुकून गेलेल्या एका रानगव्याला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची आठवण लिंगमळ्यातील घटनेने पुन्हा ताजी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.