मुंबई – मुंबईचा माजी रणजीपटू फिरकी गोलंदाज रमेश पोवार याच्यावरील बंदी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) उठवली आहे. त्यामुळे पोवारचा प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोवारवर बंदी खरेतर नव्हतीच. केवळ भविष्यातील प्रशिक्षणासाठी पोवारचा विचार करू नये, असा ठराव संघटनेने मंजूर केला होता.
गैरसमजुतीने झालेल्या या प्रकरणी त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. आता त्याची तयारी असेल तर भविष्यातील प्रशिक्षणासाठीही आता विचार केला जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
बांद्राकुर्ला संकुलातील संघटनेच्या अकादमीत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोवारने अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे संघटनेच्या तत्कालीन कार्यकारी समितीने त्याच्यावर बंदी लावली होती.
2018 मध्ये करसन घावरी यांच्या क्रिकेट सुधार समितीची पहिली पसंती असतानाही पोवारला मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद नाकारण्यात आले होते. गेल्या महिन्यात पोवारने संघटनेकडे आपल्यावरील बंदी उठवण्याबाबत विनंती केली होती ती मान्य करत संघटनेने त्याच्यावरील बंदी उठवली.