हॅमिल्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 71 धावा केल्या असून ते अद्याप 302 धावांनी पिछाडीवर आहेत. सामन्याचे आणखी दोन दिवस बाकी असून न्यूझीलंडला मोठा विजय मिळवण्याची संधी आहे.
सोमवारी पाकिस्तानचा पहिला डाव संपल्यानंतर मंगळवारी यजमान न्यूझीलंडने आपला दुसरा डाव सुरू केला. त्यांनी 5 बाद 180 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला व पाकिस्तानसमोर विजयासाठी 373 धावा करण्याचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडकडून टॉम ब्लंडलने 64, तर टॉम लॅथमने 53 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून नसिम शाहने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
विजयासाठी 373 धावांचा पाठलाग सुरू केल्यावर पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अझर अली 34 तर, फवाद आलम 21 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 2 तर, ट्रेन्ट बोल्टने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव – 431. पाकिस्तान पहिला डाव – 239. न्यूझीलंड दुसरा डाव – 45.3 षटकांत 5 बाद 180 धावा. (टॉम ब्लंडल 64, टॉम लॅथम 53, नसिम शाह 3-55). पाकिस्तान दुसरा डाव – 38 षटकांत 3 बाद 71 धावा. (अझर अली खेळत आहे 34, फवाद आलम खेळत आहे 21, टीम साऊदी 2-15, ट्रेन्ट बोल्ट 1-24).