वॉशिंग्टन – अमेरिकेच्या जनतेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र ही वस्तुस्थिती मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मान्य करायला तयार नाहीत. त्यांनी सत्ता नव्या अध्यक्षांकडे सोपवण्याच्या मार्गात सर्व प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले असताना आता बायडेन यांनीही ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवरची महत्वाची माहिती देण्यास अजुनही तयारी नसल्याचे बायडेन यांचे म्हणणे आहे.
एकीकडे ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचे जाहीर करण्यात आले असताना बायडेन यांनी हा आरोप केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. सुरक्षेशी संबंधित काही विभागांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत ट्रम्प यांच्याकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावा बायडेन यांनी केला आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले विद्यमान अध्यक्ष नव्या अध्यक्षांकडे सत्तेचे हस्तांतरण करण्यास सुरूवात करतात. साधारणत: 20 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालते अशी अमेरिकेत परंपरा आहे. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यावर कारभार पाहताना त्यांना कोणती अडचण होउ नये यासाठी ही प्रक्रिया अगोदरच सुरू केली जाते.
त्यामुळेच सत्ता हस्तांतरणाचा हा कलावधी तब्बल तीन महिन्यांचा असतो. या काळात संवेदनशील विषयांची माहिती नव्या अध्यक्षांच्या नव्या टीमला दिली जाते व नवी टीम देशासमोर प्रमुख आव्हानांचा आणि प्राधान्य देण्याच्या विषयांचा अगोदरच अभ्यास करत असते. मात्र बायडेन यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रक्रियेला गंभीर वळण लागले आहे.
ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी अगोदरच ठरलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र ते माहिती देण्यास अडथळे आणत असल्याचे बायडेन यांचे म्हणणे आहे.
भविष्यात चीनसोबत कशा प्रकारचे संबंध असले पाहिजेत याची रूपरेषा ठरविण्यासाठी ही माहिती आपल्याकरता अत्यंत महत्वाची आहे. मात्र तीच देण्यास ट्रम्प नकार देत असल्याचा बायडेन यांचा दावा आहे. त्यामुळे परराष्ट्र विषयक धोरण आणि संरक्षण विषयक बाबी ठरवताना आपल्या टीमला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बायडेन म्हणाले की चीनच्या झिंजियांग येथे मानवाधिकारांचे उल्लंघन, जगाच्या काही भागात चीनकडून केली जाणारी आगळीक, करोना विषाणूच्या संदर्भात माहिती देताना पारदर्शतेचा आभाव, अन्य देशांसोबतच्या व्यापारातही असमतोल हे प्रमुख मुद्दे चीनच्या बाबतीत आहेत.
त्यावरून ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिका आणि चीन संबंधांत मतभेद निर्माण झाले आहेत. चीन असो रशिया, अमेरिकेला पुन्हा सुस्थितीत यायचे असेल तर या सगळ्या मुद्दयांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. तसे झाले तरच भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार असल्याचे ते म्हणाले.