पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन उत्पन्न आणि प्रवासी संख्येत देखील वाढ होत आहे. सोमवारी (28 डिसेंबर) आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवासी संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला.
पीएमपीची प्रवासी सेवेचे चाक हळूहळू सुरळीत होत आहे. दिवसेंदिवस दैनंदिन उत्पन्नासह प्रवासी संख्या देखील लाखोंचे टप्पे ओलांडत आहे. इतकेच नव्हे तर, बसेसची संख्यादेखील वाढली असून, दररोज सुमारे तेराशे बसेसचे संचलन सुरू आहे.
सोमवारी सुमारे 75 लाख 30 हजार 151 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी तिकीटांद्वारे 71 लाख 49 हजार 039 रुपये आणि पासेसद्वारे 3 लाख 81 हजार 112 रुपयांचे उत्पन्न मिळाले. पहिल्यांदाच पीएमपीने 75 लाख रुपये उत्पन्नाचा टप्पा ओलांडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ब्रेकडाऊनमध्येही घट
पीएमपी बस आणि ब्रेकडाऊनचे समीकरणच झाले होते. दररोज सुमारे 100 हून अधिक बसेस भर रस्त्यात ब्रेकडाऊन होत होत्या. मात्र, आता बसेस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सोमवारी 11 बसेस ब्रेकडाऊन झाल्या. संबंधित विभागांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत बाबी आणि कामास प्रोत्साहन देण्यात येत असल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण घटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.